नॅशनल सुपरकंप्युटिंग मिशन 

देशासाठी भविष्यकालीन सुपरकंप्युटिंग तंत्रज्ञानाचे ‘नॅशनल सुपरकंप्युटिंग मिशन’ कार्यान्वित करणाऱ्या सी-डॅकचे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांच्याशी साधलेला संवाद...
 
प्रश्न - भारताच्या दृष्टीने नॅशनल सुपरकंप्युटिंग मिशन (एनएसएम) महत्त्वाचे का? आजवर त्याचा काय फायदा झाला?
डॉ. हेमंत दरबारी -
देशाच्या भविष्यकालीन गरजा बघून कॉम्प्युटर ॲप्लिकेशन विकसित करण्याच्या दृष्टीने ‘नॅशनल सुपरकंप्युटिंग मिशन’ सुरू झाले आहे. यासाठी लागणारी कॉम्प्युटिंग आणि स्टोअरेजची गरज याद्वारे पूर्ण करत आहोत. १९९१ मध्ये देशात परम श्रेणीचे महासंगणक सी-डॅकने विकसित केले होते. त्याच धरतीवर अत्याधुनिक महासंगणकांची साखळीच आता निर्माण करत आहोत. एनएसएममध्ये लागणारे कोअर सर्व्हर बोर्ड अर्थात ‘रुद्रा बोर्ड’ आम्ही विकसित केले आहे. नेटवर्किंगच्या सिस्टमसाठी लागणारे ‘त्रिनेत्र’ सिस्टम सी-डॅकमध्ये विकसित केले आहे. सुरवातीच्या टप्प्यात बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू), आयसर, आयआयटी खरगपूर, जेएनसीएसआर बंगळूर, आयआयटी कानपूरमध्ये महासंगणक बसविण्यात आले आहे. अजून १३ ठिकाणी महासंगणक बसविण्यात येणार असून, त्यांना नॅशनल नॉलेज नेटवर्कशी जोडण्यात येणार आहे. कोविडच्या काळात या महासंगणकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले आहेत. सीडॅकच्या जैवमाहिती तंत्रज्ञान चमूने ३५०० औषधांचे संगणकीय सिम्युलेशन करून कोरोनासाठी कोणते औषध काम करेल हे तपासले. १८ एप्रिल २०२० लाच आम्ही ‘रेमडेसिव्हीअर’ औषध यासाठी कामात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच अश्वगंधा, मुलेठी, आदी आयुर्वेदिक औषधांचे सिम्युलेशनही यात करण्यात आले.

एनएसएममध्ये सी-डॅकची भूमिका नक्की काय आहे? उद्योगांचा सहभाग कसा आहे?
केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि डॉ. हर्ष वर्धन, तसेच या मंत्रालयाचे सचिव, नीती आयोगाचे डॉ. व्ही.के. सारस्वत यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. एनएसएममध्ये हार्डवेअर पासून सॉफ्टवेअरपर्यंतचे काम सी-डॅक करत आहे. सिस्टम सॉफ्टवेअर, हार्डवेअर, हाय परफॉर्मन्स चीप, कॉप्युटींग क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान असलेल्या सिलिकन फोटॉनिक्सवरही आम्ही काम करत आहे. एनएसएमच्या माध्यमातून आम्ही ‘परम सिद्धी’ एआय सिस्टम विकसित केली आहे. २१० एआयपेटाफ्लॉप क्षमतेचा ही सिस्टम कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. परम सिद्धी एआय सिस्टमवर जो संशोधक कामकरू इच्छिता त्यांना हे खूप मोठे वरदान ठरणार आहे. सी-डॅक आणि उद्योगांच्या सहभागातून हे मिशन पूर्ण केले जात आहे. अत्याधुनिक प्रोसेसर आणि इतर हार्डवेअर विकसित करण्यासाठी आम्ही उद्योगांसोबत कार्य करत आहे. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या चाचण्या आणि पडताळणीसाठीही उद्योगांचा सहभाग आहे. खऱ्या अर्थाने डिजिटल आत्मनिर्भर भारताचे स्वप्न यातून साकार होणार आहे. 

कौशल्यप्राप्त तंत्रज्ञ आणि संशोधक कसे मिळवता? 
नॅशनल सुपरकंप्युटिंग मिशनच्या माध्यमातून २० हजार कुशल तंत्रज्ञ तयार करण्याची योजना आहे. आजवर त्यातील पाच हजार लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी आयआयटी मुंबई, चेन्नई, खरगपूर, पलक्कड या चार आयआयटी ‘नोडल’ केंद्र म्हणून कार्यरत आहेत. तसेच उद्योगांच्या सहकार्यानेही प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. एमएसएमचा पहिला आणि दुसरा टप्पा जवळजवळ पूर्ण झाला आहे. लॉकडाउनमुळे त्यात थोडा उशीर झाला. लवकरच आम्ही तिसऱ्या टप्प्याकडे जात आहोत. 

सी-डॅकने सुपरकंप्युटिंगबरोबरच क्वांटम कंप्युटिंगचा विचार केला आहे का? त्याची सद्यःस्थिती काय आहे?
सीडॅक क्वांटम कंप्युटिंगमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. नॅशनल क्वांटम कॉम्प्युटिंग मिशनची सुरवात झाली आहे. स्वदेशी क्वांटम कंप्युटरची निर्मितीसाठी सीडॅकने काम सुरू कले आहे. तसेच क्वांटम सिम्युलेटर, क्वांटम ॲक्सलरेटर, क्वांटम कम्युनेशेन, डीआरडीओ यंग सायंटिस्ट लॅब क्वांटम टेक्नॉलॉजी, क्वांटम क्रिप्टोग्राफी वरही काम करत आहे. ज्याप्रकारे पहिला महासंगणक सी-डॅकने बनवला तसाच  पहिला क्वांटम कॉम्प्युटर बनवावा, असा प्रयत्न आहे.

सी-डॅकच्या स्थापनेपासून आजवरचा प्रवासाकडे तुम्ही कसे पाहता?  
खूप समाधानकारक प्रवास राहिला आहे. आजवरचे अत्याधुनिक तंत्रज्ञानातील देशातले पहिले आविष्कार सी-डॅकने केलेत. परम महासंगणक, हिंदी गाण्यासाठीच पहिले जीस्ट कार्ड, भाषांतराचे सॉफ्टवेअर, आवाज ओळखणारे सॉफ्टवेअर, स्पीच टू टेक्स्ट आदी गोष्टी आम्ही प्रथम बनविल्या आहेत. आणि या सर्व प्रवासाचा मी भागीदार आहे. मायक्रोप्रोसेसर, क्वांटम कॉम्प्युटिंग, एआयइन लॅग्वेज कॉम्प्युटिंग, जेन नेक्स्ट असे सहा मोहिमा सी-डॅकने हाती घेतल्या असून, त्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. सायबर सुरक्षा, ११२ हा आपत्कालीन क्रमांक, ‘वन नेशन वन कार्ड’मध्येही सीडॅकचा सिंहाचा वाटा आहे. इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, दिल्ली सेफ सीटी आदी प्रकल्पामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय स्तरावर आम्ही आरोग्य, शिक्षण, सुरक्षा क्षेत्रात कार्य करत आहोत.

काय?
देशातील संशोधन संस्था, उद्योग, सेवा सुविधांसाठी लागणाऱ्या सुपरकंप्युटिंग तंत्रज्ञानाच्या गरजा भागविण्यासाठी ‘नॅशनल सुपरकंप्युटिंग मिशन’ सुरु करण्यात आले आहे. 

कसे?
केंद्रीय संशोधन संस्थांमध्ये अत्याधुनिक महासंगणक बसविण्यात येत आहे. हे सर्व संगणक ‘नॅशनल नॉलेज नेटवर्क’शी जोडले जात आहे. याद्वारे कोणताही संशोधक सुपरकंप्युटिंगसाठी याचा वापर करू शकतो.

कोण?
केंद्र सरकारचे माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग या मंत्रालयांच्या अंतर्गत प्रगत संगणन विकास केंद्र अर्थात सी-डॅक आणि भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) च्या नेतृत्वात देशभरात हे मिशन राबविण्यात येत आहे.

केव्हा ?
२०१५ मध्ये २०१९ मध्ये बीएचयूमध्ये पहिला महासंगणक बसविण्यात आला होता. आतपर्यंत मिशनचे सुरवातीचे दोन टप्पे पूर्ण आले असून, मार्च दरम्यान तिसरा टप्पा सुरू होईल.

कोठे ?
देशातील आयआयटी, आयसर, विद्यापीठे आदी संशोधन संस्थामध्ये महासंगणक बसविण्यात येत आहे.

Edited By - Prashant Patil



from Sci-tech Feeds https://ift.tt/2O4BYH0

Comments