National Science Day 2021 : का साजरा केला जातो 'राष्ट्रीय विज्ञान दिन'?

नवी दिल्ली : 28 फेब्रुवारी म्हणजेच आजचा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस तसा भारताच्या वैज्ञानिक घडामोडींसंदर्भातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. याच दिवशी 1928 रोजी महान वैज्ञानिक आणि नोबल पुरस्कार विजेता सर सीव्ही रमन यांनी आपल्या प्रसिद्ध अशा रमन इफेक्टचा शोध लावला होता. हा शोध यासाठी विशेष ठरला कारण या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. याच कारणामुळे 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विज्ञानविषयक अनेक बाबींवर चर्चा, चिंतन आणि उपक्रम राबवून सीव्ही रमन यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केला जातो. 

हेही वाचा - Corona : देशात 113 रुग्णांचा शनिवारी मृत्यू; रुग्णसंख्येत वाढ

केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही यानिमित्ताने देशवासीयांना सदिच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, #NationalScienceDay निमित्त देशातील सर्व वैज्ञानिकांना सदिच्छा. हा दिवस देशातील संशोधकांच्या प्रतिभेला तसेच त्यांच्या दृढ निश्चयाला सलाम करण्याचा आहे. विशेषकरुन, कोरोना काळात आपल्या वैज्ञानिकांनी नव्या संशोधनाद्वारे देशाची तसेच जगाची जी मदत केली आहे, ती अद्भूत अशीच आहे. 

का साजरा केला जातो विज्ञान दिन?
समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य ध्येय म्हणजे देशातील विज्ञान क्षेत्रातील प्रगती अविरत कायम ठेवणे.  'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' तसेच 'विज्ञान आणि तंत्रज्ञान' मंत्रालयाकडून या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बहुतेक शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये विज्ञान संबंधित अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. याशिवाय विज्ञान संस्था, विज्ञान प्रयोगशाळा, विज्ञान अकादमींमध्ये अनेक वैज्ञानिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

हेही वाचा - आसाममध्ये भाजपला मोठा झटका; प्रमुख सहकारी पक्षाने धरली काँग्रेसची वाट
कोण होते सीव्ही रमन?
सीव्ही रमन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी झाला होता. रमन हे  अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. त्यांनी वयाच्या 11 व्या वषीर्च शालेय शिक्षण संपवून 15 व्या वर्षी ते इंग्रजी आणि विज्ञानामध्ये पदवीधर झाले होते. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी फिजिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण उच्च श्रेणीमध्ये पूर्ण केले होते. त्यानंतर ते कोलकाता येथे डेप्युटी अकौटंट जनरल पदावर रुजू झाले पण या रुक्ष नोकरीमध्ये त्यांचं मन रमेना म्हणून ते कोलकाता येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अगदी कमी पगाराच्या नोकरीत रुजू झाले. मात्र, 1921 मध्ये कलकत्ता विद्यापीठाकडून त्यांना ब्रिटनला उच्च शिक्षणासाठी पाठवण्यात आले. यावेळी त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये 'भारतीय तंतूवाद्ये' हा शोधनिबंध सादर केला. पुढे युरोपातून समुदमार्गे भारतात परत येत असताना त्यांना आकाशातील निळ्या रंगाला पाहून त्यांचे कुतूहल जागृत झाले. आकाश निळ्या रंगाचेच का दिसते? अशा प्रश्नांमधून त्यांचे संशोधन सुरू झाले आणि त्यातून त्यांनी भारतात परतल्यावर पाणी, बर्फ यांमधून प्रकाशाचे विकिरण (स्कॅटरिंग) यावर संशोधन सुरू केले आणि यातूनच उदयास आला तो रमन इफेक्ट! यातूनच साऱ्या जगाला आकाशाच्या निळ्या रंगाची उत्तरे मिळाली!



from Sci-tech Feeds https://ift.tt/3r4ywdT

Comments